राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यामुळे ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत मोर्चे आणि आंदोलन सुरू आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असून, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्या वागणुकीमुळे ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचे नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. तसेच तालुक्याची जी कार्यकारणी होती, तीदेखील बरखास्त करण्यात आली आहे.
सुनील तटकरे यांनी घेतलेला मोठा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे यांचे नाव आल्यानंतर घेण्यात आला आहे. विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होते, मात्र या गुन्ह्यात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही लोकांची चौकशी आणि तपासणीही झाली. त्यानंतर सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण काम पाहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कळवले आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची तपासणी करूनच नेमणुका कराव्यात, अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.
काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना मोक्का लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती. अनेक हिंसक आंदोलनं कार्यकर्त्यांनी केली होती, त्यासंदर्भातील माहिती अजित पवार यांनी घेतली.
धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची घेतली भेट
या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले. त्यामुळे आज धनंजय मुंडे परळीत काही भूमिका स्पष्ट करणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.